फणशीची नाळ व आग्या नाळ – एक संस्मरणीय ट्रेक

8 min read 1,540 words 16 views

जानेवारी महिन्यात आमच्या ‘अचाट भरमू’ गटातील मित्र मोहनिश चक्रवर्ती यांनी घाटमाथ्यावरून रायगड परिसरात उतरणारी दुर्मिळ वाट – फणशीची नाळ उतरून, आग्या नाळ चढत दमदार ट्रेक केला. याच काळात मीही सिंगापुर नाळेने उतरून रायगडाचे दर्शन घेतले होते. तवीची नाळ, बिबनाळ, आग्या आणि फडताड या वाटा बऱ्याच दिवसांपासून मनात घर करून होत्या. मात्र, या वाटा कमी वापरात असल्याने एकट्याने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे समविचारी सह्याद्रीप्रेमी सोबत घेऊन हा रोमांचक ट्रेक करायचा विचार मनात येत होता.

माझा वारज्यातील डोंगरवेडा मित्र साकेत मिठारीला हा ट्रेक करण्याची कल्पना दिली आणि तो एका पायावर तयार झाला. आमचा अजून एक उत्साही साथीदार, हरीश कुलकर्णी, तर ताबडतोब “चला” म्हणून हट्ट धरून बसला. परंतु, दुर्दैवाने मला त्या काळात विषाणूजन्य ताप झाला आणि नियोजित आठवड्यात जाणे शक्य झाले नाही. ताप बरा होताच, सराव म्हणून सिंहगड सर करून आलो. हे पाहताच हरीशचा फोन आला – “आता तुम्ही बरे आहात, चला या आठवड्यात निघूया!” आता काही कारण उरले नव्हते, त्यामुळे आम्ही शनिवारी भल्या पहाटे ट्रेकसाठी निघण्याचा निर्णय घेतला.

सह्याद्रीच्या शिलेदारांची जुळवाजुळव

हा हा म्हणता, पंधरा जणांचा अनुभवी व कडवट ट्रेकर्सचा चमू तयार झाला. चिरतरुण विजय बुटाला (वय फक्त ७४ वर्षे), ट्रान्स सह्याद्रीवीर संदीप चौगुले, सह्याद्री अभ्यासक मिलिंद बोडस आणि संतोष जाधव, ट्रेक लीडर साकेत मिठारी, हरहुन्नरी हरीश कुलकर्णी, तसेच उर्जावान ट्रेकर मुकुंद पाटे, जालिंदर कामठे, प्रशांत वाजगे, प्रमोद माने, शिरीष गोडबोले, रविंद्र कविटकर आणि आमच्या चमूतली एकमेव महिला प्रतिनिधी – माझी अर्धांगिनी मनिषा!

शनिवारी पहाटे चार वाजता पुण्यातून प्रस्थान ठेवले. वेल्हे मार्गे भट्टी वागदऱ्यावरून कानंद खिंड ओलांडून आमची बस सिंगापूर मोहरीच्या फाट्याला पोहोचली तशी वाट अधिक बिकट झाली. आमचा वाटाड्या, एकलगावचा बाळू कचरे, आदल्या रात्री यात्रेच्या तमाशात रमला होता. त्याला गाठण्यासाठी बराच वेळ फोन फिरवला. अखेरीस सकाळी सव्वासहाला संपर्क झाला. “तुम्ही व्हा पुढे एकलगावात, मी आलोच अर्ध्या तासात!” असे सांगून तो दुचाकीवर निघाला.

आम्ही प्राथमिक शाळेसमोरील पटांगणात पोहोचलो. ट्रेकची आखणी झाली, सर्वांची ओळखपरेड झाली. बाळूची वाट पाहणे भाग होते, कारण फणशीची नाळ व आग्या नाळ नियमित वापरात नसल्याने नुसत्या GPS मार्गदर्शिकेवर अवलंबून राहणे धोकादायक होते. त्याची वाट पाहण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला, हे पुढे आम्हाला प्रकर्षाने जाणवले.

फणशीची नाळ – एक अनोखी उतराई

साडेसातला बाळू साहेब हजर झाले. न्याहारी करून, कमरेला कोयता लावून, “चला!” असा फर्मान सोडताच आम्ही त्यांच्या मागे निघालो. वाटेवरून दिसणारा रायगड आणि लिंगाणा मंत्रमुग्ध करणारा होता. मात्र, काही वेळातच वाट काटेरी झाडाझुडपात शिरली. बाळूच्या कोयत्याचा सतत आवाज येऊ लागला. थोड्या वेळात आम्ही जननीदेवीच्या ठाण्याजवळ पोहोचलो. येथूनच फणशीच्या नाळेची वाट खाली उतरते.

फणशीच्या नाळेच्या सुरुवातीलाच मुरमाड घसारा आणि सुकलेल्या पालापाचोळ्याच्या खचाने आमची परीक्षा सुरू झाली. प्रत्येक पावलागणिक दगडगोटे ढासळत होते. वॉकींग स्टीकचा उपयोग जाणवत होता. दोन-अडीच तासांच्या खडतर उतारानंतर आम्ही नाळेच्या बुडाशी आलो. येथेच डावीकडच्या ओढ्यातून आग्या नाळेकडे चढाई सुरू होते.

आग्या नाळ – सह्याद्रीतील कठोर परीक्षा

दुपारचे उन्हाळत चालले होते आणि चढाईची वेळ आली होती. सुरुवातीला दगडगोट्यांतून उडी मारत चढाई करत होतो. थोड्याच वेळात आम्ही एका पाणवठ्यावर पोहोचलो. तेथील थंडगार पाणी पाहून सर्वजण सुखावले. पाणी भरून घेतल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढे, समोर मोठा कातळधबधबा आ वासून उभा होता. बाजूने भक्कम मुरमाड घसाऱ्यातून चढाई करावी लागली.

वर पोहोचताच पुन्हा जननीमातेचे ठाणे लागले. देवीचा आशीर्वाद घेत, पुढे निघालो. आता खरी कसोटी सुरू झाली. आग्या नाळेतील अत्यंत उभ्या कड्याने शरीरातील ऊर्जा वेगाने संपवायला सुरुवात केली. मध्येच मुकुंद पाटेने आग्या नाळेतील भलीमोठी पोळी दाखवली आणि सगळ्यांनी आवाज न करण्याचा निर्णय घेतला.

नाळेच्या शेवटच्या टप्प्यात एक प्रचंड उंबराच्या झाडाजवळ आलो. तिथून एका अरुंद ट्रॅव्हर्सने एकलगावकडे जाता येते. पण ही वाट आणखीनच घसरणीची होती. उजवीकडे खोल दरी आणि डावीकडे मुरमाड पायवाट… येथे प्रत्येक पाऊल म्हणजे जीवावर बेतणारा प्रसंग! काही वेळानंतर आम्ही ओढ्यात पोहोचलो. आता गाव जवळ येत होते, पण अजून दोन टेकड्या पार करायच्या होत्या. शेवटच्या टप्प्यात, पूर्ण शक्ती खर्च झाल्यामुळे वारंवार थांबत होतो. शेवटी, एकदाचे एकलगावच्या शाळेसमोरील पटांगणात पोहोचलो.

शेवटी सर्वांनी थोडा विसावा घेतला आणि गाडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. या दोन दुर्गम नाळवाटांनी आमची शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेतली होती, पण त्याचबरोबर सह्याद्रीच्या अजस्र सौंदर्याची अनमोल अनुभूतीही दिली होती!

– संदीप कुतवळ

 

Leave a Reply